नाशिकच्या तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे भेट देऊन आढावा घेतला. तपोवन मैदानाची पाहणी करुन विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून शहराचे ब्रँण्डिंग करण्यासाठी अनेक उपक्रमांसह शहरात ठिकठिकाणी सजावटीचेही नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक युवकांच्या सहभागातून वॉल पेंटिंग, आकर्षक रोषणाई करण्यात येणार असून शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनही यादृष्टीने उत्तम तयारी करत असून सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नातून हा युवा महोत्सव अविस्मरणीय होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
